16 Sep 2023


बिर्याणी

असं म्हणतात की बिर्याणीचा शोध अकबराने लावला. त्याच्या सैन्याला कुठल्याही मोहिमेवर निघण्या आधी भरपूर protein आणि carb मिळावे हा त्यामागचा सरळ उद्देश्य. म्हणजे सकाळी सकाळी अकबराच्या सैन्यातील कुठल्या मोईनउद्दिन ने ताटभर बिर्याणी हाणली तर डायरेक्ट रात्री कॅलेंडरने(Mr. इंडिया फेम) वाढल्यावर किंवा बहात्तर पर्यांनी घास भरवल्यावर या मोईनउद्दिनचा आत्मा अन भूक शांत होत असावी.
Anyway , तर पुणेकरांना या बिर्याणीचा पाहिला साक्षात्कार कँपात आला. Dorabjee ने मटण धनसाक, पात्रा नी माच्छ, लगन ना stew आणि ofcourse बिर्याणी सारख्या विविध चविष्ट आणि कधी कधी सात्विक पुणेकराला निषिद्ध अश्या पारसी/मुस्लिम उत्कृष्ट cuisines खाऊ घातल्या आणि प्रचंड प्रसिद्ध केल्या. तसं तर पुण्यात आसरा, दुर्गा सारख्या रस्सा भाकरी/चपाती वाढणाऱ्या अस्सल मराठा खानावळी होत्याच पण कॅम्प म्हणजे जुन्या साहेबाचा फील देणारा,स्कर्ट घालूनही उघड्या गोऱ्या पोटऱ्या दाखवणारा, स्लिव्हलेस टॉप अन् गॉगल घातलेल्या देखण्या पोरींचा वावर असलेला आणि पुण्यात असूनही पुण्यात नसल्यासारखा जरासा posh area, पेठेत राहणाऱ्या शालीन पुणेकराला नेहमीच आकृष्ट करत आला होता व आहे.
Coming back to biryani.
बिर्याणीचा बेसिक मसाला म्हणजे लवंग,वेलची अन् मिरची. त्यात मग इतर अनेक मसाले अन् जिन्नस पडत गेले अन् बिर्याणी वयात येऊ लागली. पुण्याबाहेर बिर्याणी म्हटलं की सगळ्यांना डोक्यात फक्त दोन शहरे येतात : हैदराबाद व लखनौ. दोन्ही ठिकाणची बिर्याणी वेगळी आणि त्यांची कैफियतही वेगळी. एका बिर्याणीला नवाबाचा मुलामा तर एकीला निजामाचा , एकीत केशराचा शिडकावा तर एकीकडे केवड्याचा वर्षाव. तशी कलकत्याची पण बिर्याणी असते बरका, ज्यात मटनाबरोबर बटाटे घातले जातात!
तर प्रत्येक प्रांतानुसार बिर्याणी बदलत गेली. बाल्टिक प्रदेशात आणि जुन्या सोव्हिएत महासंघाच्या काही देशात बनणारा मूळचा बीफ किंवा मटण पिलाफ भारतात आणि उपखंडात येऊन वेज पुलाव झाला. तसच काहीसं या बिर्याणीचही झालं. बिर्याणीची अनौरस कन्या म्हणावी तशी वेज बिर्याणी जन्माला आली आणि तितकीच प्रसिद्ध झाली.
कॅम्प सोडून पुण्यात बिर्याणी प्रसिद्ध करण्याचं श्रेय जातं ते टिळक रस्त्यावरच्या SP बिर्याणी house ला. बिर्याणी चा चेहरा मोहराच काय , तर माझ्यामते त्यांनी बिर्याणीचा gender पण बदलून टाकलाय! बिर्याणीला त्यांनी रांगडं केलं. बोकडा ऐवजी बोलाई आणली , आणि होते नव्हते तेवढे सगळे मसाले त्यात घालून त्या बिर्याणीची आय बहीण एक करून टाकली! पण तिखट मसालेदार आवडणाऱ्या पुणेकराला तसल्या बिर्याणी नामक acidity च्या बोचक्याने मोहवून टाकले. आणि मग पुण्यात इतरत्र बिर्याण्या तशाच बनायला लागल्या : ओंगळवाण्या! शिवाय खपायलाही लागल्या.
असो, एकेकाची आवड.

Comments

Popular posts from this blog

Review : The Crown

Review : The Great Indian Kitchen