Review : The Great Indian Kitchen
फेमिनिसम! मला या उक्तीची ओळख अगदी हल्ली हल्लीच झाली असे म्हणायला हरकत नाही. काय होतं फेमिनिसम माझ्यासाठी? मानवाधिकार, मानवी हक्क संरक्षण इत्यादी पश्चिमात्य विचारधारांप्रमाणे भारतात आश्रयास आलेल्या चैनी पाश्चिमात्यांच्या विघातक व विद्रोही सवयी. लहान असताना माझ्या आई वडिलांना सगळी कामं वाटून घेताना खरंतर मी पाहिलं होतं पण बहुदा ही कामं तुझी (म्हणजे माझी) नाहीतच , तू अभ्यास कर या परिस्थितीजन्य फर्माना किंवा प्रेमापोटी मी ती कामं किंवा स्वयंपाक करण्याच्या भानगडीत कधी पडलो नाही, अभ्यास मात्र केला. शिवाय त्यावेळी जवळच्या नातेवाईकांच्या किंवा शेजारी-पाजारी आवर्जून, पुरुष अथवा स्त्रीसत्ताक प्रणालीच नजरेला जाणवली. Neutral असं नव्हतंच काही. त्या कारणामुळे फेमिनिसम lightyears लांब होतं माझ्या पासून.
माझ्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मी आमची बेडरूम झाडत होतो , तेव्हा माझी एक काकू मला चिडवण्याच्या हेतूने खोचकपणे म्हणाली होती की हा चांगलाच सुधारला दिसतोय ,की बायकोने झाडू दिला हातात? तेव्हा आतून मला तिचा केवळ रागच आलेला नव्हता तर मला तेव्हा स्वतःची थोडी लाजही वाटलेली. अगदी टिपिकल संस्करांप्रमाणे काही कामं बायांचीच असतात अशी माझी घट्ट समजूत झालेली तोपर्यंत."स्वयंपाक" या समजुतीतील एक महत्वाचा घटक , भांडी घासणे वगैरे हा दुसरा!
काल प्राइम वरचा "The Great Indian Kitchen" हा मल्याळी सिनेमा पाहिला. मधुर भांडारकरच्या चित्रपटांप्रमाणे हा चित्रपट बोट धरून चालायला शिकवत नाही. भारतीय चित्रपटांप्रमाणे यात भडकपणा नाहीये , किंवा यात खलनायकी कावेबाजीही नाहीये. खलनायक असेलच तर तो सिस्टिम च्या वेशात , प्रांजळ संस्कारांच्या वेशात आणि समाजाने घरातील स्त्रीला प्रदान केलेल्या दुय्यम दर्जात विसावला आहे!
"The Great Indian Kitchen" मधील सासरा नवविवाहित सुनेला केव्हाही आवेशपूर्ण मार्गदर्शन वा सल्ला देत नाही. त्याची बायको , म्हणजे तिची सासू इतक्या वर्षात त्याच्या तालमीत तयार झालीये.तिची सासू MA झालीये.तिचा सासरा तिला प्रेमळ सल्ले देत राहतो जसे की चटणी नेहमी हाताने वाटायची असते - मिक्सर मध्ये नाही, कपडे हाताने धुवायचे असतात -मशीन मध्ये नाही.हे सांगताना तो प्रेमळपणे हसत असतो आणि त्याच्यात वागणुकीतून कुठलाही अभिनिवेश जाणवत नाही.
तिला कित्येक गोष्टी खटकायला लागतात. उष्टी काढताना तिला उबळ यायला लागते , लेडी मॅकबेथ प्रमाणे घाण स्वच्छ करायला ती सतत हात धूत बसते .एकीच्या हाताचा दर्प विश्वासघाताचा असतो तर एकीचा केविलवानेपणाचा . ती घाण अन नवऱ्याने अन सासऱ्याने टाकलेलं उष्ट जणू तिच्या सत्वाला चिकटून बसतं.

Comments
Post a Comment