24 April 2023
Sachin !!!
आमच्याकडे लाकडी कपाटात जेरबंद असलेला ब्लॅक अँड व्हाइट टीव्ही साधारण १९८४ मध्ये आला असं पुसटसं आठवतं मला. बहुदा खूप महिने वाट पाहिल्यावर , रेड टेपाला ओलांडून एका संध्याकाळी तो घराच्या एका कोपऱ्यात ऐटीत establish झाला. त्यावर तेव्हा विम्बल्डन चालू होतं हेही पुसटसं आठवतंय.
'83 च्या क्रिकेट वर्ल्ड कप ने भारतीय मनांची समीकरणे सपशेल भरकटवून टाकली होती. त्यानंतर आलेला रिलायन्स कप आणि मावळतीला आलेले गावस्कर, वेंगसरकर, श्रीकांत इत्यादींना पर्याय कोणता असावा इतका विचार करायची amateur बुद्धी माझ्यात तयार होत होती. तेव्हाच कपिल देव ने क्रिकेट ट्रेनिंग साठी टीव्ही वर रविवार सकाळी एक अर्ध्या तासाचा कार्यक्रम सादर करायला सुरुवात केली. आणि मी ती अधाश्यासारखी पाहू लागलो. Outswing , inswing , frontfoot, backfoot , इत्यादी गोष्टी कळू लागल्या आणि मी आणि माझी टीम, घराजवळच्या वावरात 20, 25 पैश्याच्या मॅचेस लावून त्या कसबाची अंमलबजावणी करू लागलो.
कपिलच्या त्या कार्यक्रमात त्याच्याबरोबर एक कुरळ्या केसाचा 14, 15 वर्षाचा तरतरीत पोरगा असायचा आणि त्याची देहबोली इतकी आश्वासक असायची की कुठलाही शॉट मारताना तो एकदम सोपा आहे याचा आत्मविश्वास तो पोरगा करून द्यायचा. तेव्हा हे कळलं नाही की क्रिकेट रक्ताप्रमाणे त्याच्या अंगांगत भिनलय म्हणून त्याची बॅट आणि त्याची मनगटं बहुदा एकच आहेत.
पुढे १९८९ मध्ये पाकिस्तान विरुद्ध त्या पोराने भारताकडून क्रिकेट विश्वात प्रवेश केला ... अवघ्या सोळाव्या वर्षी!
हाच तो सचिन तेंडुलकर ज्याने पुढे जाऊन आपल्या सर्वांची क्रिकेट पहायची शैलीच बदलून टाकली.भारत ज्या काळात मंडल, मंदिर , बॉम्बस्फोट ,आणि MMS ची नवीन आर्थिक धोरणं आत्मसात करून जुळवून घेत होता , त्या काळात सचिन टीव्ही वर येणे , अलगद ५०/१०० धावा करणे आणि त्याचे आकाशाकडे पाहणे , तो केव्हातरी बाद झाला तसं टीव्ही बंद करून टाकणं हे इतकं सवयीचं झालं होतं की सचिन हा त्या केव्हाही अस्त न होणाऱ्या ब्रिटीश साम्राज्यासारखा वाटू लागला.
आज त्याने आयुष्याची हाफ सेंच्युरी गाठली आणि विश्वास बसतच नाहीये की हाच आहे का तो कोवळा पोरगा ज्याची मिथकं त्या अमर अशवाथाम्यासारखी असतात!

Comments
Post a Comment