May 28 , 2022


नाटक,सिनेमा, केबल टीवी ,इंटरनेट आणि आता OTT , अशी गेल्या शंभरच्या वर वर्षांची परंपरा मराठी कला जगताला आहे.

भारतीय चित्रपट संस्थेच्या स्थापनेचे श्रेय प्रामुख्याने मराठी चित्रपट निर्माते घेऊ शकतात इतकं योगदान त्यांचं त्यात आहे,जसे की तोरणे, फाळके , बाबुराव पेंटर , आणि थोडं उशिरा आलेले भालजी पेंढारकर , मास्टर विनायक ,वी शांताराम,जब्बार पटेल आणि असे अनेक दिग्गज चित्रपट निर्माते होऊन गेलेत ज्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया भरला.
अगदी चार पाचशे वर्षांपासून मराठी श्रोतुवर्ग अभंग-पोवाडा- लावणी इत्यादीने सुरुवात झालेल्या करमणुकीच्या स्रोतांचे यथोचित रसपान करीत आला आहे आणि प्रगल्भ झाला आहे. त्यातच पुस्तकं,लोकगीतं , आणि अशी इतर करमणुकीची साधनं आहेतच.
ही असली वाटचाल पाहता आज मराठी करमणुकीचं घोडं कुणी अडवलं? टीवी वरील मराठी मालिकांचा इतका सुमार दर्जा कसा काय झाला? कौटुंबिक कलह , भांडणं , द्वेष, मत्सर , धर्म, देव , इतिहास हा पॅटर्न सोडला तर आज काहीही पिकवलं जातच नाहीये , किंवा ना त्याला विकण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. मराठी लेखक बहुदा पुस्तकांमध्येच किंवा मासिकात अडकून पडलेत. टीवी वरचा पसारा पाहता, पेस पाहता आणि एकता कपूर बाईंनी सुरुवात करून दिलेल्या फॉरमॅट ला चिकटून राहण्याच्या शपथेला पाहता , गेल्या वीस वर्षात , एक दोन दहा अपवाद वगळता,मराठी टीवी,सिनेमात काहीही नवीन तयार झालेलं नाहीये.
मराठीला , हॉलिवूड , इरानियन , युरोपियन , जपानी , दक्षिण भारत अश्या काही सिनेमांशी तुलना करण्याइतकी पत मिळवायला खूप कष्ट करावे लागणारेत. त्याचं एक कारण इथला प्रेक्षक आहे , जो अजूनही स्वतःच्या डबक्या बाहेर जाण्याची इच्छा धरताना दिसत नाही. अश्वत्थाम्या प्रमाणे त्याला खऱ्या दुधाची चव ठाऊक नाहीये.
शिवाय , मराठी सिनेमा/मालिकांत दुर्दैवाने आळशी लेखक/पटकथाकार शिल्लक राहिलेत , जे निर्मात्यांना फॅक्टरी प्रमाणे output देताहेत. आजचा निर्माता जुन्या राजे नवाबांसारखा कलाउपासक व आश्रयदाता नाहीये. तो या क्षेत्राकडे नफा-तोटा खात्यासारखं पाहतो आणि रिस्क घ्यायला घाबरतो.
तरीही जसं वर लिहिलंय तसे, चैतन्य ताम्हाणे ,नागराज मंजुळे,उमेश कुलकर्णी व गँग असे काही अपवाद आहेतच ज्यांच्यावर रिस्क घ्यायला निर्माते तयार आहेत.
म्हणून मग कोंबडी आधी की अंड आधी हे कोडं सोडवायचं असेल तर मराठी प्रेक्षकालाही खूप वेगवेगळं पाहावं लागेल , मग ते YouTube असो की Netflix , PIFF असो की IFFI , कि प्रायव्हेट film clubs असोत,प्रत्येकाच्या एका आयुष्याला पुरेल इतका कंटेंट आहे. सतत डोक्याला शॉट लावणारच पाहायचं असही नाहीये खरंतर , कारण मग भाडीपा सारख्या YouTube channel चे लाखो चाहते आहेतच , फक्त एकच मेख आहे की असल्या टाईप चा चॅनल तरुण वर्गापर्यंत सीमित आहे. RRR,KGF, बाहुबली सारख्या टुकार सिनेमांना हजारो करोड मिळू शकतात कारण ते out of the box विचार करतात , तांत्रिकी बाजू भक्कम करतात ,larger than life पात्र उभी करतात.
मराठीत केव्हा होणार असलं काही ?

Comments

Popular posts from this blog

Review : The Crown

Review : The Great Indian Kitchen