Review - How to become a tyrant!

 How to become a tyrant

--Netflix
लोकशाही प्रजासत्ताक ,व धर्मनिरपेक्ष राष्ट्राची किंमत तेव्हा कळते जेव्हा तुमच्या राष्ट्राला एक हुकूमशहा प्राप्त होतो किंवा असं म्हणूयात की जेव्हा तुमचं राष्ट्र एका हुकूमशहाला पैदा करतं , पण तेव्हा कदाचित उशीर झालेला असतो व निदान एखादी पिढी ,तिचं स्वातंत्र्य तरी या राजवटीत बेचिराख होतं! हा हुकूमशहा त्या राष्ट्राला पूर्ण पिळवटून , त्याचा चोथा अखेर जनावरांना प्राप्त करून देतो.
दोन दिवसांपूर्वी नेटफ्लिक्स वर "How to become a tyrant" हा सहा एपिसोड शो पाहिला. एक उत्तम हुकूमशहा किंवा tyrant होण्याची ही जणू एक हँडबुक किंवा पुस्तिका आहे.
आजपर्यंत आपण पाहिलेले व न पाहिलेले असे कित्येक हुकूमशहा व त्यांच्या सत्तेपर्यंतचा प्रवास आपल्याला यात पाहायला मिळतो
हिटलर , स्टालिन , माओ , मुसोलिनी , मुआमार गडाफी , इदी अमीन , सद्दाम हुसेन , किम संग इत्यादी पॉप्युलर तर खमेर रुज चे पोल पॉट , फ्रँको ,चौसेस्क्यू , मेंगीतसु आदी विसर पडलेले किंवा कमी प्रमाणात ज्ञात असलेले परंतु समप्रमाणात क्रूर , सत्तापिपासू,सत्ताकेंद्री , भ्रष्ट , व आत्मपूजक हुकूमशहा यात आहेत.
संतायना याने म्हटलंय की जे कोण इतिहास विसरतात त्यांना त्याची पुनरावृत्ती घडवून आणण्याचा शाप मिळालेला असतो. म्हणून चाणाक्ष राज्यकर्ते इतिहासाचा कठोर अभ्यास करतात अन काळचक्रातील खाचखळगे मापून ठेवतात.
तर हुकूमशहा कसं व्हायचं?
धाधांत व बेदरकारपणे खोटं बोलायचं , म्हणजे किम जोंग इल (आपल्या सध्याच्या किमचा बाप) जेव्हा आपल्या बापाच्या सावलीतून बाहेर पडायचा प्रयत्न करत होता तेव्हा त्याने स्वतःच्या जन्माच्या खोट्या कहाण्या बनवून पसरवल्या , आपण सुपरह्यूमन आहोत आणि वन्यप्राणी वगैरे किस झाड की पत्ती असं म्हणून त्यांना डासांसारखं चेचून टाकलं (मगरीशी झुंज वगैरे आठवलं आपोआपच 😉) .
आपल्या देशाचं इतर देशांनी शोषण करून करून पार वाटोळं करून टाकलंय म्हणून आपण आता juche (कोरियन विचारसरणी) म्हणजे आपल्या भाषेत "आत्मनिर्भर" होऊयात. गडाफीने आत्मनिर्भरतेची सुरुवात ब्रॉयलर ऐवजी देशी कोंबड्या प्रजनन करण्यावर भर देऊन केली, अन त्याच्याच बरोबरीने निव्वळ बावळटपणाचे वळवंटाला नंदनवन बनवण्यासारखे अतिभव्य खर्चिक निर्णय घेतले .
इदी अमीन ने आपल्या देशाची अधोगती ही भारतीयांमुळे झालीये म्हणून त्यांना देशाबाहेर हाकलून दिले. त्यात संपूर्ण आयुष्य युगांडात घालवलेली प्रजा होती , तिथेच जन्माला आलेली पोरं होती , पण हुकूमशाहीला खापर फोडायला एक सबब लागते. म्हणजे जसं हिटलरला ज्यू , अन सध्याचा हॉट टॉपिक म्हणजे "हिंदू खतरे मे है" ला मुस्लीम समाज!
हुकूमशहा होण्यासाठी तुम्हाला गेंड्याची कातडी असावी लागते जी स्टालिनकडे होती , त्याने लेनिन नंतर आपसूकच आपण त्याचे वारसदार आहोत हे पसरवण्यासाठी पहिला फोटोशॉप वापरला, beyond science वाले म्हणजे ढग आणि रडार सारखी अनेक फालतू संशोधने केली. विरोधकांना काही कळायच्या आत त्यांना नामशेष करून टाकले , सेन्सॉर बोर्ड आणला , कायदे बदलले आणि व्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला चढवला. स्टालिन विरुद्ध जो बोलतो तो देशाविरुद्ध बोलतो हा ब्रेनवॉश आणला. UAPA सारखे कायदे आणले आणि त्यांचा वापर : सरकारचा निषेध म्हणजे राजद्रोह हा विश्वास दृढ केला. खोटे हिरो तयार केले , त्यांचा पुरेपूर फायदा उचलला. वर्षानुवर्षे एकत्र राहणाऱ्या शेजाऱ्यांना प्रतिस्पर्धी बनवले व Human rights इत्यादी फुटकळ कल्पना असून त्याचा रीतसर खून केला.
यातील प्रत्येक हुकूमशहा त्याग ,जाज्वल्य राष्ट्रप्रेम , पराकोटीचा अल्पसंख्यांकांचा द्वेष , पूर्वीच्या राजवटींनी केलेल्या तथाकथित भ्रष्टाचाराच्या दंतकथा, भाषा, संस्कृती अश्या कित्येक कुबड्यांच्या आश्रयाने सत्ता उपभोगत असतो.
असं म्हणतात की बेडकाला उकळत्या पाण्यात टाकलं की तो तडक त्यातून उडी घेतो , पण त्याला थंड पाण्यात टाकून हळूहळू पाणी उकळलं तर तो तसाच उकळत राहतो आणि शेवटी मरून जातो!
तशीच दुरावस्था या हुकुमशहांच्या अंध अनुयायांची होते.
पण जेव्हा ते लक्षात येतं तेव्हा त्यांचं टेस्टी बेडूक सूप झालेलं असतं!




Comments

Popular posts from this blog

Review : The Crown

Review : The Great Indian Kitchen