Minimalism!

 जागतिक पर्यावरण दिवस आणि Minimalism!

साधारण ६० च्या दशकात अमेरिकेत minimalism ची चळवळ सुरू झाली. कित्येक चळवळींप्रमाणे तिची उत्पत्ति कलाक्षेत्रातून झाली आणि हळूहळू फोफावत एक lifestyle झाली. Modernist किंवा abstract expressionism या दुसऱ्या महायुद्धानंतर नव्याने तयार झालेल्या शैलीविरोधात काही कलाकारांनी Minimalist शैली उभी केली.
Minimalist या संकल्पनेशी साधर्म्य असलेला मराठी शब्द मला माहीत नाही , पण त्याचा अर्थ समजायला अवघड नाही. एकदम सोपं करायचा प्रयत्न केला तर ,Minimalism म्हणजे गरजेपूरतेच वापरणे/उपभोगणे किंवा प्रदर्शित करणे !
मध्यंतरी netflix वर एका मेरी कोनडो या जपानी बाईचा एक शो पाहिला. त्या शो मधील सहभागी कुटुंब अमेरिकन व जागाही अमेरिकेतलं कुठलसं शहर होतं. कुटुंब मध्यमवर्गीय व आपल्याकडील (म्हणजे भारतातील) थोड्या उच्चमध्यमवर्गीय कुटुंबासारखच ते होतं. तर ती मेरी बाई या कुटुंबातील सदस्यांना पसारा कसा आवरायचा याचे प्रायोगिक धडे देत होती! कुठलीशी वस्तु वापरुन तुम्हाला आनंद होतो की त्या वस्तूत केवळ तुमची भावनिक गुंतवणूक आहे असले प्रश्न ती त्यांना विचारत होती आणि त्यातूनच त्यांचा त्या वास्तूप्रती असणाऱ्या त्यांच्या नात्याचा पोकळपणा अधोरेखित करत होती , जेणेकरून त्यांना त्या वस्तुला सोडचिठी देणे सोपे आणि कमी त्रासाचे व्हावे.
अश्याने कित्येक 'अनावश्यक' वस्तूंचा त्याग करून ते कुटुंब आनंदी झाले आणि मेरी बाईचं काम संपलं!
वरील ऊपवृत्तान्त थोडा अतिरंजित आणि vanity टाइप ( त्वाडा कुत्ता कुत्ता..) जरी वाटत असला तरी , गेल्या दोनेक दशकात आपल्याकडे आलेल्या आर्थिक सुबत्तेमुळे तंतोतंत समरूप झालाय. त्यांच्या प्रमाणेच आपल्या इथल्या अतिश्रीमंत कशाला , कुठल्याही घरच्या माळ्यावर शोध घेतला तर एखादा जुना फ्लॉवरपॉट , गेल्या दहा वर्षात कधीही वापरलं नं गेलेलं पातेलं , ४० वर्षात कधीही नं उचकटलेलं जुन्या कागदपत्रांचं ढांडोळं , एखादी गेलेली ट्यूबलाइट , गेलेल्या लायटिंगच्या माळा , साक्षात इंग्लंड ची राणी जरी जेवायला घरी आली तरी नं काढता येणारा डायनिंग सेट, पंख्याचं एकुलतं एक पातं , लग्नात-वाढदिवसाला मिळालेले ताजमहाल, गणपती ,लाफिंग बुद्धा, भांडी असा भावनिक गुंतवणुकीतून केलेला अनावश्यक साठा हमखास सापडू शकतो !
गेल्या वीसेक वर्षात किराणा दुकाना पेक्षा भव्य असे मॉल आले व discounts आले, आकर्षक मांडणी आली, चकाचक पॅकेजिंग आलं आणि आपण त्या कांचन मृगाच्या ओजस्वितेच्या प्रेमात ,डोपामाईन आणि पैसा उधळत गरजेपेक्षा जास्ती गोष्टी घेऊ लागलो आणि कल्पना करवणार नाही त्या प्रमाणात प्रदूषण तयार करते झालो.
नुसत्या पुण्यात आपण एका दिवसाला अंदाजे १६०० टन कचरा तयार करतो , आणि त्यातील १२% कचरा हा प्लॅस्टिक कचरा असतो. म्हणजे दिवसाला १९२००० किलो नुसतं प्लॅस्टिक!!! या प्लॅस्टिकचं विघटन होत नाही कि ते कुजत नाही, ते जातं जमिनीत (land fills) आणि शतको न शतके आपल्या इतिहासाचा भाग होऊन राहतं.
शिवाय असलं प्लॅस्टिक तयार करायला लागणाऱ्या रासायनिक घटकांपासून तयार होणारा निचरा तलाव,नदी, समुद्र यांना क्रमिक पणे बेचिराख करत राहतो .
युवाल हरारी म्हणतो तसं माणसाने जेव्हा अन्न गोळा करता करता अन्न तयार करण्यापर्यंत प्रगती केली , अगदी त्याच क्षणापासून जंगलांच्या , प्रादेशिक जनावरांच्या जमिनीच्या आणि एकुणातच निसर्गाच्या अधपतनाची स्थापना माणसाने करून ठेवली . त्या अधपतनाला हातभार लावायचं काम गेल्या २०० वर्षांपासून औद्योगिकीकरण आणि भांडवलशाहीने एकत्रितपणे चोख बजावलं .
हे सर्व उमजत असताना Minimalism या संकल्पनेची जुनीच ओळख नव्याने आपल्याला झाली आहे . Minimalist जीवनशैली अंतर्भूत करायची म्हणजे नेमकं करायचं काय ?
Minimalist लोकांचे बरेच types आहेत .. मी त्यांचे वर्गीकरण पुढील प्रमाणे करीन
१. कट्टर minimalist : यांनी वीज, स्वयपाकाचा गॅस इत्यादि आपल्याला वाटणाऱ्या मूलभूत सुविधांचा त्याग केलेला असतो . त्याला ते पर्यायी व्यवस्था शोधत असतात. काही मोठाली हॉटेलं , मॉल कालबाह्य झालेलं अन्न कचऱ्यात फेकून देतात. तर असले Minimalist त्या अन्नाच्या शोधात फिरतात. रस्त्यावर मारून पडलेल्या जनावारांचं कलेवर गोळा करतात (तश्या आपल्याकडे कित्येक जमाती आहेत पण त्या परिस्थितीने बेजार असल्यामुळे ते करतात). अग्रिम मनुष्याप्रामाणे ते आधुनिक forager असतात. तुम्ही जर Nomadland पाहिला असेल तर याची कल्पना येईल.
२. सौम्य लेवल-१ : यांनी मूलभूत सुविधांचा संपूर्ण त्याग केलेला नसतो , पण त्या सुविधांचा अपारंपरिक पर्याय त्यांनी शोधलेला असतो (सोलर , विंड इत्यादि ) , कचऱ्याचा निचरा ते स्वतः करत असतात ( म्हणायला आता प्रगत महापालिकांमध्ये त्याची वेगळी नियमावली आलेली आहेच) . त्यांनी आधुनिक व्यवस्थेशी नाळ जोडून ठेवलेली असते आणि ते तिचा भागही असतात. खरेदी जपून आणि हवी तेवढीच करतात ,ऊर्जा जपून वापरतात आणि अजिबात वाया घालवत नाहीत. प्रवासात पाण्याच्या बाटल्या विकत घेत नाहीत , म्हणजे स्वतच्याच नेतात . यांच्याकडे २ ते ३ जोड कपडे असतात , आणि एखादा जोड चपल बुटांचा. जवळचा प्रवास करायला सायकल वापरतात , आणि इंधन जाळताना विचार करतात.
३. सौम्य लेवल-२ : हे नावाप्रमाणेच थोडे जास्ती सौम्य. हे सोयीस्कर minimalist असतात. म्हणजे त्यांनी जर खराब झालेल्या इलेक्ट्रोनिक वस्तु कचरापेटीत टाकायच्या ऐवजी कुठल्या संस्थेला दिल्या तर त्यांनी पर्यावरणासाठी आपण ठोस कामगिरी केली असे त्यांना वाटते . जागतिक पर्यावरण दिवसाच्या शुभेच्छा ते न विसरता देतात .झाडे लावतात
जवळपास जाताना ते चारचाकी ऐवजी दुचाकी वापरतात , किंवा सध्याचा हॉट आयटम म्हणजे एखादी लिथियम आयन बॅटरी असलेली एखादी इलेक्ट्रिक गाडी ते वापरतात. (या Li-Ion बॅटऱ्यांचा एक तोटा म्हणजे त्या पारंपरिक लेड ऍसिड बॅटऱ्यांप्रमाणे रीसायकल होत नाहीत आणि त्यांनाही प्लॅस्टिक प्रमाणे लँड फिल मध्ये पुरावे लागते.)
Minimalism हा औद्योगिकीकरणाचा शत्रू नंबर १ आहे. आणि अमर्याद आणि बेलगाम औद्योगिकीकरण हा निसर्गाचा शत्रू नंबर १ आहे.
तर काय करुयात ?
थोडसं minimalist होऊन पाहू ( सुरुवात सौम्य लेवल-२ ला केली तरी चालेल ). मला जवळपासचे सगळेच कंजूष म्हणून ओळखतात , कारण माझ्याकडे २-३ जोड कपडे आहेत (आता ते म्हणतील कि बुटांचे ५ जोड आहेत त्याचं काय? तर ते गरज म्हणून घेतलेत ) . मी दुकानात गेलो तर फक्त हवं तितकंच घेतो , इतकी वर्षे मला कार पण घ्यावीशी वाटली नाही (पण नाईलाजास्तव ती घेतलीच म्हणा) , कारण जमेल तेव्हा मी पब्लिक ट्रान्सपोर्ट , उबर , सायकल , चालणे या साधनांचा वापर करून अपेक्षित स्थळी जात असे. गोष्टी विकत घेताना मी चारदा त्याचा पर्यावरणावर होणाऱ्या विपरीत परिणामाचा विचार करतो. मटन , चिकन आणायला जाताना स्वतःच भांड घेऊन जातो. नोट्स काढताना बहुतेकदा डिजिटल टूल्स वापरतो , आणि कागदावर लिहिताना पेन्सिल eraser वापरतो ..
आणि अश्या अनेक गोष्टी. यात मला माझा मोठेपणा सांगायचा नाहीये. तर फक्त आपण आरामात करू शकू अश्या छोट्या प्रयासामुळे फरक नक्की पडतो हे दाखवून द्यायचे आहे!
कर के देखो !!!

Comments

Popular posts from this blog

Review : The Crown

Review : The Great Indian Kitchen