Love is in the air!

 #Loveisintheair

कित्येक वर्षांपूर्वी यायचा तो, किंवा आला होता! एकदा आला की जातंच नसे, थांबून राहायचा, हातावर दिसायचा, पाठीवर ,मानेवर, ओठावर, मेंदूवर , आतडीत, आणि मुख्यकरून माझ्या कुचक्या , आंबट ,चरबट हृदयावर टिकून राहायचा!
तो शहारा मी विसरून गेलो होतो, होता का नव्हता? की स्वप्नरंजन होतं? कुणास ठाऊक? असा गायब झाला की कळलेच नाही. येईल का पुन्हा? , हा विचारही केला नाही मी कधी , किंवा यायला हवा असही वाटलं नाही कधी!
! कुठेच नाही सापडला तो शहारा!
पण आला तो एकदाचा!
तुझ्याशी बोलताना, आपण अगदी नवीन होतो एकमेकांना, पहिल्यांदा जाणवला , अंगभर नाही अगदी, पण पोटात जाणवला. फुलपाखरागत बागडत राहिला होता बराच वेळ. कुठेतरी खेचतोय मला ही जाणीव झाली होती पहिल्यांदा तेव्हा.
नक्की काय होतं ते? वासना होती ? , कुणाच्यातरी डोक्यात, विचारात तू आहेस , हे गुदगुल्या करून टाकणारं तात्पुरतं गृहीतक होतं बहुदा! नक्की माहीत नाही!
तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा DDLJ चा सीन आठवला होता , आणि आपण तर दोघेही फिल्मी!
त्याला आता सतरा वर्षे झालीत पण भासताना असे भासताहेत , की जणू paleontology ची मापनयंत्रणा अभ्यासतोय! 2004 म्हणजे paleozoic, मग 2007 triassic, मग 2008 जुरासिक मग 2021 म्हणजे cretacious . असं वाटतंय की मी तुला कित्येक शतके ओळखतोय.
माझ्यासाठी तुझं शरीरही नवीन पालवी घेऊन आलं.
तुझा जो पहिला खरा स्पर्श झाला तेव्हा मी तो आभासी शहारा प्रत्यक्ष पाहिला , अनुभवला!
त्यावर मी अजूनही कधी कधी जगतो.
हे सगळं उत्क्रांतीच्या नियमाप्रमाणे संक्रमण करत होतं.आणि त्याबरोबर सतत असायची अंधारातून त्याचा पाठलाग करणारी माझी एक अनामिक भीती.
ती भीती माझ्या स्वभावातील विचित्रपणाची, माझ्या लगेच कंटाळून जाणाऱ्या मनाची, आणि त्या भीतीशी लढायला लागणाऱ्या प्रचंड ऊर्जेची!हो त्याचीही मला भीतीच वाटायची.
कदाचित त्यामुळेच मी सतत तुझ्यापासनं लांब जात असावा. पण प्रत्येकवेळी ठळकपणे जाणवलं की माझ्याभोवती तुझं असणं गरजेचं आहे. तुझा स्पर्श, तुझी मिठी, तुझं अंग, तुझं अंतरंग सगळं सगळं हवंय मला.
तुला लांब ढकलून दिल्यावर माझं भिडस्त मन क्षणभर हुश्श करतं , मोकळं वाटून श्वास घ्यायला लागतं, पण फक्त क्षणभर. कारण तिसऱ्या श्वासाला ते तुझ्याकडे ओढलं जाऊ लागतं, तुझं सगळं हवंहवंसं वाटायला लागतं मला.
तू नसतेस तेव्हा सिलसिला मधलं अमिताभचं मनोगत कानावर पडत राहतं... तुम होती तो..
पण मग मला तू फक्त यासाठीच आवडतेस का? खूप विचार केला मी याचा. कधी वाटतं की मला तुझं व्यसन लागलं होतं/आहे. तू जर मठ्ठ मुलगी असतीस तर तुला मी अलगद बाजूला सारून टाकलं असतं अन त्याचं मला यत्किंचितही दुःख झालं नसतं!
मग ते व्यसन आहे का? मला तुझ्याआधी लक्षात आलं होतं की मी तुझ्या प्रेमात पडलोय. हे व्यसन नाही, नुसतं आकर्षण नाही आणि ही नुसती शारीरिक भूकही नाही.
तुझी मिठी मला जास्ती आश्वासक वाटते, आणि मला तितकाच अभिमान वाटतो तुझा जेव्हा तू इतकं छान लिहितेस.
पण तुझं लिहिणं हे मला माझं वाटतं. कारण तू मला माझी वाटतेस हक्काची.
तुझ्या बरोबर मला खूप जगायचंय अजून, तुला माहितीये की मी प्रचंड विचित्र माणूस आहे, तरीही म्हातारं झाल्यावर , हाडं खिळखिळी झाली तरी
तुझ्याबरोबर वाळूत पडून, समुद्र पाहायचाय , अन त्याच वाळूत पडून आकाशातले तारे पहायचेत, तुझ्या स्वप्नातल्या सारखे. तुझ्याबरोबर tv पाहत आळसवत पडून राहायचंय , तुझ्याबरोबर 21km पळायचंय (होपिंग फॉर द स्टार्स💓), भांडायचय पण पुन्हा परत एकत्र यायचंय.
हो आणि ते आपलं पोरगं विसरलोच ..त्यालाही एक दमदार व्यक्ती बनवायचंय..
पिक्चर अभी बाकी है my love!

Comments

Popular posts from this blog

Review : The Crown

Review : The Great Indian Kitchen